संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी घरोघरी साजरी करून युवकांनी व्यसनमुक्त होण्याचा संकल्प करावा – वर्षा शिंदे

 


पाटोदा: प्रतिनिधी 

संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी यंदा केवळ पूजाअर्चेपुरती मर्यादित न ठेवता, ती सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल ठरावी, असे मत सावता सेनेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षा वर्षा शिंदे यांनी व्यक्त केले आहे.त्यांनी सांगितले की, "संत सावता महाराज हे कार्य, श्रद्धा आणि समाज सेवेचे प्रतीक होते. त्यांनी शेती करताना समाजाला समतेचा, शुद्ध आचरणाचा आणि भक्तीमार्गाचा संदेश दिला. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त युवकांनी एकत्र येऊन व्यसनमुक्त समाज घडवण्याचा संकल्प करावा, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.

"संतांच्या पुण्यतिथी निमित्त घरोघरी दीप प्रज्वलन, अभंग गायन, हरिपाठ आणि सामूहिक प्रार्थना घेण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या दिवशी युवकांनी तंबाखू, दारू, गांजा यांसारख्या व्यसनांपासून कायमचा संयम बाळगण्याचा संकल्प करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा, असेही त्यांनी सांगितले.संत सावता महाराज यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन युवकांनी समाजात बंधुभाव, सेवा आणि स्वच्छतेचा संदेश पसरवावा, असे आवाहन करत "संतांचा मार्ग म्हणजेच स्वच्छ जीवनाची वाट!"

 असा संदेश त्यांनी दिला.या उपक्रमातून समाजात व्यसनमुक्तीचा नवा आदर्श निर्माण होईल आणि संतांचे विचार खऱ्या अर्थाने आचरणात येतील, असा विश्वासही वर्षा शिंदे यांनी व्यक्त केला आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.