सांगोला: प्रमोदराजे बनसोडे
एखतपूर (ता. सांगोला) केंद्रातील बुरुंगलेवाडी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका, उपक्रमशील,आदर्श शिक्षिका सविता विजय राऊत यांना शैक्षणिक वर्षे २०२४-२५ मधील सांगोला पंचायत समितीच्या वतीने दिला जाणाऱ्या "आदर्श शिक्षक" पुरस्काराने गौरविण्यात आले.
बुरुंगलेवाडी (ता. सांगोला) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनेक विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना विविध स्पर्धेत सहभाग घेऊन जिल्हा परिषद शाखेचा नावलौकिक वाढविला आहे. विद्यार्थी प्रिय असलेल्या शिक्षिका सविता विजय राऊत यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सांगोला पंचायत समिती वतीने शैक्षणिक क्षेत्रातील मानाचा दिला जाणारा "आदर्श शिक्षक" पुरस्कार हा बुरुंगलेवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सविता विजय राऊत यांना सांगोला तालुक्याचे विद्यमान नवनिर्वाचित आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते व माजी आमदार दीपक आबा सांळूखे पाटील यांच्या उपस्थिती मध्ये प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलकर्णी हे होते. प्रमुख पाहुणे सांगोला तालुक्याचे आमदार सन्माननिय डॉ. भाई बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, विस्तार अधिकारी, लक्ष्मीकांत कुमठेकर साहेब, अमोल भंडारी, एखतपूर केंद्राचे केंद्रप्रमुख अस्लम इनामदार साहेब यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सविता विजय राऊत ह्या बुरुंगलेवाडी-सोनलवाडी केंद्र-एखतपूर ता.सांगोला जि.सोलापूर येथे कार्यरत असून ते उपक्रमशील शिक्षिका तसेच शाळेसंबंधीत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय उपक्रमात त्यांचे महत्वाचे योगदान आहे. याशिवाय वक्तृत्व, कथाकथन, रंगभरण, चित्रकला, रांगोळी,
आकाशकंदील बनविणे याविविध स्पर्धाचे आयोजन, वार्षिक स्नेहसंमेलन, माता पालकांचे प्रबोधन, वृक्षलागवड व वृक्ष संगोपन विद्यार्थ्यामध्ये निसर्गाबद्दल आपुलकीची भावना निर्माण करणे, इंग्रजीतून परिपाठ इत्यादी उपक्रम शाळा स्तरावर अतिशय चांगल्या पद्धतीने घेण्यात त्यांचा सहभाग मोलाचा आहे. जनगणना, अंधश्रध्दा निर्मुलन, बेटी बचावो अभियान, मतदान जनजागृती अभियान, स्वच्छ भारत अभियान यासारख्या सामाजिक कार्यक्रमात त्या अग्रेसर असतात. सविता विजय राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने विद्यार्थी, पालकांसह सर्वस्तरातुन त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.